वैजापूर-गंगापूर तालुक्यात सर्वाधिक | वैजापूरातील अंतापुरात 6 जण बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार रात्रभर कोसळतच होता. वैजापूर तालुक्यात तब्बल 160 मिमी पाऊस कोसळला. त्याखालोखाल गंगापूर तालूक्यात 150 मिमी तर खुलताबाद तालुक्यात 131 मिमी पाऊस कोसळला. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एकाच दिवशी 84 मंडळात अतिवृष्टी झाली. शहरातील कांचनवाडी मंडळात 142 मिमी गंगापूर तालुक्यातील हर्सूल मंडळात 196 मिमी डोणगाव 193 मिमी पाऊस झाला. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे 6 लोक आणि 3 लोक अडकले होते त्यांची सुटका करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे 27 जण अडकले होते, बाभुळगाव येथे 17 लोक अडकले होते. त्यापैकी 42 जणांची सुटका करण्यात आली आहे. वैजापूर शहरात 250 लोक पुरात अडकले होते प्रशासनाने त्यांची सुटका केली. अंतापूर येथे 6 जण पुराच्या पाण्यात बेपत्ता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारीत 5 जण घराच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठवाड्यावर शनिवारी रात्री आभाळच कोसळले. सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडून काढले. छत्रपती संभाजीनगर जिल्हयात तर रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. तर जायकवाडी धरण क्षेत्रात कोसळलेल्या पावसाने धरणातून 1 लाख 75 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्बल 84 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 15 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. वैजापूर तालुक्यातील 13, पैठण आणि गंगापूर 12, सिल्लोड 11, कन्न्ननड 9, फुलंब्री 5, सोयगाव 4 आणि खुलताबाद तालुक्यातील 3 मंडळात अतिवृष्टी झाली. वैजापूर तालुक्यात तब्बल 169 मिमी पाऊस पडला. गंगापूर तालुक्यात 150, खुलताबाद 131, कन्न्नड 127, फुलंब्री 120, सिल्लोड 87, छत्रपती संभाजीनगर 75, सोयगाव 71 मिमी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस
जिल्ह्यात सर्वदुर मुसळधार पाऊस बरसला आहे. सर्वच तालुक्यात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेल्या 24 तासात तब्बल 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षातील हा रेकॉर्ड पाऊस असल्याचे आकडेवारी सांगते. सिल्लोड तालुक्यात वार्षीक सरासरीच्या तब्बल 330 टक्के पाऊस झाला आहे. तर कन्नड 300 टक्के, सोयगाव 267, वैजापूर 266, पैठण 256, गंगापूर 219, खुलताबाद 195, फुलंब्री 186 तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 153 टक्के पाऊस झाला आहे.
पैठण शहराला वेढा...
जायकवाडी धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जायकवाडीत सुरू झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे आज 27 दरवाजे उघडण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. विलास भुमरे यांनी सकाळी जायकवाडी धरणाची पाहणी करण्यात आली. सकाळी तब्बल 1 लाख 75 हजार क्यूसेक वेगाने धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.